बालसंस्कार शिबिर २०२५ हे २६ एप्रिलपासून सुरू होऊन ३ मे रोजी समारोपासह उत्साहात संपन्न झाले. आठ दिवसांच्या या शिबिरात मुलांना जीवनमूल्यांचे धडे तर दिलेच, शिवाय जुन्या परंपरागत हरवलेल्या खेळांद्वारे आनंददायक संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यात आले.
दररोज वेगवेगळ्या विषयांवर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी ज्योती भंडारी यांनी ‘प्रार्थना, श्लोक आणि विचारांचे सामर्थ्य’ याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी नुपूर दत्ता यांच्याकडून ‘वर्तमानपत्रातून हस्तकला’ शिकण्याचा अनुभव शिभीरार्थ्यांना मिळाला. तिसऱ्या दिवशी रामकृष्ण अभ्यंकर यांनी ‘सणोत्सवांचे महत्व व कथा’ या विषयावर सुस्पष्ट संवाद साधला. चौथ्या दिवशी प्रज्ञा वनारसे यांनी ‘संस्कृती संवर्धन’ या विषयावर मुलांमध्ये मूल्यांची बीजे रोवली. पाचव्या दिवशी माधुरी काटकर यांचे ‘स्वयंसंरक्षण’ विषयावर सत्र अतिशय उत्साहवर्धक ठरले. सहाव्या दिवशी अमित जाधव यांच्या ‘अभिनयाची तोंड ओळख’ या कार्यशाळेमुळे मुलांमधील सर्जनशीलता उफाळून आली. सातव्या दिवशी वैष्णवी शिंगटे यांनी ‘वैदिक गणित’ सादर करत मजेशीर पद्धतीने गणिताची ओळख करून दिली. आठव्या दिवशी समारोप सत्रात मार्गदर्शन व भेटवस्तू वितरणासह सर्वांच्या मनात घर करणारा कार्यक्रम संपन्न झाला.
समारोपाच्या दिवशी सा रे ग म प लिटील चॅंप २०२१ ची विजेती गौरी गोसावी हिच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. तिच्या मातोश्री भक्ती गोसावी, मनशक्ती केंद्राचे तुकाराम गवस, तपूर क्रियेशनच्या नूपुर दत्ता व शिवसेना बोरिवली प्रमुख संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाने मुलांना आणि पालकांना मौल्यवान विचारांचे मार्गदर्शन लाभले. दीपप्रज्वलन, मुलांचे स्तोत्र पठण, गौरीचा संवाद, आणि पसायदानाने या समारंभाला एक संस्कारी स्वरूप मिळाले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. सर्व मुलांना खाऊ, पुस्तके व कलेस प्रोत्साहन देणाऱ्या भेटवस्तू देण्यात आल्या. हे आठ दिवस संस्कार, आनंद, आणि संस्मरणीय अनुभवांनी भरलेले ठरले.







